मुल:- आसोला तलावांतर्गत येणाऱ्या सावली सिंचन उपविभागातील गोवर्धन उपकालव्याच्या कामाचा दर्जा आता चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मजबुतीकरणाचे काम पूर्ण होऊन काहीच दिवस झाले असताना, गोवर्धन उपकालव्याची भिंत (पाळ) थेट खचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाने आपली चूक सुधारण्याऐवजी खचलेल्या भागावर प्लास्टिक टाकून ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे सिंचन विभागाच्या आणि कंत्राटदाराच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आसोला तलावाच्या सावली सिंचन उपविभागांतर्गत गेल्या वर्षभरापासून दिघोरी आणि गोवर्धन उपकालव्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत (टेल) पाणी पोहोचावे यासाठी मुख्य कालव्यातून देवाडा, बोंडाळा, बेंबाळ, घोसरी, नांदगाव, गोवर्धन आणि दिघोरी या परिसरांत भूमिगत पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, कामाच्या सुरुवातीपासूनच यात अनेक अनियमितता पाहायला मिळाल्या.
नियोजित मार्ग बदलला: ठरलेला मार्ग सोडून परस्पर पाइपलाइन नेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचलेलेच नाही.
निकृष्ट दर्जाचा मुरूम: कालव्याच्या पाळीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात आला. मुरुमाची योग्य प्रकारे दबाई (Roller Compaction) न करताच पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे पाळ खचली.
काँक्रीट अस्तरीकरणाला धोका: निकृष्ट साहित्यामुळे काँक्रीट अस्तरीकरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कामाची गुणवत्ता इतकी निकृष्ट आहे की पाणी सोडताच भिंत खचली. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने प्लास्टिक टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालवला आहे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई झाली पाहिजे.
जितेंद्र चुदरी उपसरपंच, घोसरी

