Bhadrawati News: कोंबड्यांच्या झुंजी; सुमठाण्यात चौघांना अटक

Bhairav Diwase

भद्रावती:- सुमठाणा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर भद्रावती पोलिसांनी रविवारी धाड टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेला जुगार उधळून लावला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून ३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


टाऊन बीट परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांना कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. छापा टाकताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गणेश मनोहर फटाले (वय ३६), राजा मोठी शेट्टी (वय ३९), रा. मोहबाळा, अतुल ज्ञानेश्वर पिंपळकर (वय ३१) रा. मासळ, अशोक शंकर कावळे (वय ६५), रा. दाताळा यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून १ हजार ९६० रुपये रोख जप्त करण्यात आले.


तसेच दोन जखमी व तीन जिवंत असे पाच कोंबडे ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात आला. लिलावातून १ हजार ५०० रुपये मिळाल्याने एकूण ३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.