Chandrapur hospital: चंद्रपूरची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर?

Bhairav Diwase
गंभीर रुग्णाला दीड तास रुग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ!


चंद्रपूर:- 'चंद्रपूरची आरोग्य व्यवस्था नक्की रुळावर आहे की व्हेंटिलेटरवर?' असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातानंतर चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय व्यवस्थेचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात घडला. या अपघातात अमरावती निर्मलकर (रा. संजयनगर, चंद्रपूर) या महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचे पतीही जखमी झाले.


अपघातानंतर सुरुवातीला जखमींना प्रथम उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.


मात्र खरी शोकांतिका पुढेच घडली! डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेला तातडीने 'न्यूरोसर्जन' (Neurosurgeon) डॉक्टरांची गरज होती. परंतु, चंद्रपूरच्या या मुख्य रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्धच नव्हते! आधी "खाट उपलब्ध नाही" असे सांगून टाळाटाळ करण्यात आली आणि नंतर "तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपचार करता येणार नाहीत" असे सांगण्यात आले. परिणामी, गंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाला तब्बल दीड तास ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) मध्येच वेदनेने विव्हळत राहावे लागले!


या भीषण प्रकारामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड संताप पसरला. "चंद्रपूर जिल्ह्यात दोन खासदार आणि सहा आमदार असतानाही येथील सामान्य जनतेला वेळेवर आरोग्य सेवा का मिळत नाही?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधींच्या या दुर्लक्षामुळेच रुग्णांचे प्राण धोक्यात येत असल्याचा थेट आरोपही स्थानिक नागरिकांनी केला.


अखेर या गंभीर महिला रुग्णाची बिकट अवस्था पाहून त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे 'गोल्डन अवर'मध्ये उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण? आणि लोकप्रतिनिधी या व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे कधी गांभीर्याने पाहणार? हा प्रश्न कायम आहे.