श्वानपथकासह राबवली मोहीम; रामनगर पोलीसांचे धाडसत्र!
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दि. २५ जुलै रोजी नागपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या 'डीएनआर' ट्रॅव्हल्समधून अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, रामनगर पोलिसांच्या पथकाने श्वानपथक व पंचांच्या समक्ष वाहनाची कसून झडती घेतली.
गुप्त माहितीवरून धडक कारवाई
पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करून आवश्यक परवानगी मिळवली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, शासकीय पंच, छायाचित्रकार आणि अंमली पदार्थांची ओळख पटवणारे दोन विशेष प्रशिक्षित श्वान यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले.
डीएनआर ट्रॅव्हल्स बस चंद्रपुरात पोहोचताच सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पंचांसमक्ष वाहनाची श्वानांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. मात्र, या प्राथमिक तपासणीदरम्यान वाहनात कोणताही संशयित अथवा प्रतिबंधीत माल मिळून आला नाही. या संदर्भातील सर्व कायदेशीर नोंदी व प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केल्या आहेत.
अवैध तस्करांना रामनगर पोलिसांचा इशारा
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, यापुढेही आंतरजिल्हा व आंतरराज्य चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि संशयित वाहनांवर कडक नजर ठेवली जाईल. अवैध प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ किंवा अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना किंवा प्रवाशांना अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे व इतर पोलीस अंमलदारांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
आंतरजिल्हा व आंतरराज्य ट्रॅव्हल्समधून होणाऱ्या अवैध तंबाखू व ड्रग्ज तस्करांवर आता पोलिसांची करडी नजर असेल. याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी रामनगर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा.

