Video Viral: आधी रस्ता अडवला, खात्री केली अन्...; ताडोबाच्या 'छोटी मधू' वाघिणीची सतर्कता कॅमेऱ्यात कैद!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आईची काळजी आणि तिची सतर्कता याला या जगात कोणतीही उपमा नाही... मग ती मानवी वस्ती असो वा घनदाट जंगल! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून मातृत्वाचे एक असेच अनोखे आणि भावूक करणारे दृश्य समोर आले आहे.


ताडोबातील प्रसिद्ध वाघीण 'छोटी मधू' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या अद्भुत सतर्कतेमुळे! मोहर्ली मार्गावरून आपल्या बछड्यांना घेऊन जात असताना, छोटी मधू आधी एकटीच रस्त्यावर आली. तिने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेतला, परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. आणि जेव्हा तिला खात्री पटली की आता धोका नाही, तेव्हाच तिने झाडीत लपलेल्या आपल्या बछड्यांना बाहेर येण्याचा सिग्नल दिला! आईची खूण मिळताच हे गोंडस बछडे अतिशय शांतपणे रस्त्याच्या पलीकडे गेले आणि पुन्हा जंगलाच्या सुरक्षित सावलीत शिरले.


पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग केवळ वन्यजीवप्रेमींसाठीच नव्हे, तर निसर्गातील मातृत्वाचा एक दुर्मीळ दस्तावेज ठरत आहे. बछड्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या 'छोटी मधू'च्या या सतर्कतेचे आता चौफेर कौतुक होत आहे.