चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या (CSTPS) इरई धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत इरई धरणातील पाण्याची पातळी २०५.९५० मीटर इतकी गाठली आहे. पाण्याची वाढती आवक पाहता, धरणाची सुरक्षितता राखण्यासाठी धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महानिर्मिती प्रशासनाकडून इरई नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा तीव्र इशारा (High Alert) देण्यात आला आहे. यात पदमापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, बडोळी, चिचेली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, माना, चंद्रपूर शहर परिसर आणि इरई नदीच्या काठावर राहणारे सर्व नागरिक सतर्क राहावे.
नदीकाठच्या सर्व नागरिकांनी तात्काळ नदीच्या पात्रापासून दूर राहावे. आपली जनावरे, वाहने व इतर मालमत्ता सुरक्षित स्थळी हलवावी. सूचनांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीस महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) जबाबदार राहणार नाही.
दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून धरणाकडे जाणारे सर्व मुख्य रस्ते आणि मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत.

