चंद्रपूर:- चंद्रपुरातील बस स्थानक परिसरातील एका कार्यालयातून ६ लाख रुपयांची रोख रक्कम लांबवणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेने छत्तीसगडमधून शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
चंद्रपूर येथील डी.एस.के. ग्रीन कॉलनीतील रहिवासी राकेश अवघडे यांच्या बस स्थानक परिसरातील ऑफिसमधून अज्ञात चोरट्याने ६ लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथक तैनात केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने थेट छत्तीसगडमधील राजनांदगाव गाठले. तेथून संशयित आरोपी वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया याला ताब्यात घेण्यात आले.
कडक चौकशीदरम्यान आरोपीने २७ जुलै रोजी ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीकडून चोरीच्या एकूण रकमेपैकी ३ लाख रुपये जप्त केले आहेत. उर्वरित रकमेचा शोध सुरू असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर कारवाई सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पोहवा संदीप, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे व पोअं. शशांक बदाम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

