चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथे असलेल्या रामदेव बाबा सॉल्व्हेंट्स (RBS) या कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या डिस्टेन्शन प्लांटला ही आग लागली असून, ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
या कंपनीत सुमारे 1.25 लाख लीटर इथेनॉलचा प्रचंड साठा असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुदैवाने, या घटनेत सध्या कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
आगीची तीव्रता पाहता, स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. सध्या ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि मूल येथील अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. याव्यतिरिक्त, शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातून वडसा येथून दोन अतिरिक्त फायर ब्रिगेड दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे दोन फायर टेंडर फोम सोल्युशनसह तातडीने रवाना करण्यात आले आहेत.
इथेनॉलच्या मोठ्या साठ्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



