Fire News: पाच ते सहा कुटुंबांच्या तात्पुरत्या झोपड्या जळून खाक; लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात

Bhairav Diwase
सिंदेवाही:- राष्ट्रीय महामार्गालगत राहणाऱ्या छत्तीसगडमधील सुमारे पाच ते सहा गरीब कुटुंबांच्या तात्पुरत्या झोपड्यांना काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

या दुर्घटनेत कुटुंबांचे कपडे, धान्य, आणि इतर जीवनावश्यक सामान जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

छत्तीसगडमधील हे कुटुंबे सिंधीच्या झाडापासून तयार होणाऱ्या झाडूंचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांनी मेंढा माल येथे राष्ट्रीय महामार्गालगत तात्पुरत्या झोपड्या उभारल्या होत्या. सध्या या कुटुंबीयांच्या मूळ गावी लग्नकार्य असल्याने ते सर्व जण छत्तीसगडला गेले आहेत. झोपड्या ज्वलनशील साहित्याच्या असल्याने आग वेगाने पसरू शकली असती.

आग लागली तेव्हा, केवळ गिराकण मालिया यांच्या कुटुंबातील एक नातलग झोपडीत झोपलेली होती. मात्र, आग लक्षात येताच ती तरुणी वेळेत बाहेर पडल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.

याचवेळी काही कामानिमित्त तळोधीकडे जात असलेले नगरसेवक युनूस शेख, त्यांचे सहकारी मित्र रितेश घुमे आणि गौरव इजमुलवार यांना धूर दिसला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सिंदेवाही अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

अग्निशमन दलातील प्रतीक जैस्वाल आणि त्यांच्या टीमने जलद प्रतिसाद देत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आग इतरत्र पसरली नाही.

सिंदेवाही पोलीस प्रशासन देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची नाकेबंदी करून गर्दी नियंत्रणात ठेवली, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या मदतकार्यात कोणताही अडथळा आला नाही.

आगीत सर्व काही गमावलेल्या या गरीब कुटुंबांसाठी नगरसेवक युनूस शेख यांनी छत्तीसगड सरकारने तातडीने मदतीसाठी धाव घ्यावी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. प्रभावित कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.