दोन वर्षानंतर ग्रामीण भागात नाटकांना दमदार सुरुवात #Natak #Saoli #saolinews

रसिकांचाही प्रतिसाद; गेवरा बुज परिसरात अनेक नाटके सादर
सावली:- संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध पावलेल्या झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील झाडीपट्टी नाट्य रंगभूमी कोरोनाच्या पादुर्भावामुळे बंद पडली होती. शासनाचे बंदीचे निर्बंध असल्यामुळे दोन वर्षांत कुठेही प्रयोग करता आले नाही. मात्र, आता निर्बंध हटविल्याने नाटकांना दमदार सुरुवात झाली आहे. गेवरा बुज व परिसरात गावात मंडई निमित्त अनेक नाट्यप्रयोग सादर झाले आहेत.
गावागावांत नाटकांची रेलचेल सुरू झाली आहे. यामुळे झाडीपट्टी नाट्य रंगभूमीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल झाडीपट्टी करीत असते. याद्वारे शासनाला महसूलही मिळत असतो. ही नाटकांची परंपरा कित्येक वर्षांपासून विदर्भात अविरत नांदत आली आहे.
येथील नाट्य रंगभूमीने कित्येक नाट्य कलावंतांना जन्म दिला आहे. ते या भूमीत अजरामर झाले आहेत. कित्येकांनी आपले संपूर्ण जीवन या कलेच्या क्षेत्रात वाहून घेतले आहे. दिवाळी पर्वापासून सुरू होणारी ही नाटकांची रेलचेल तीळसंक्रांतीत अफाट गर्दी करू लागते व मार्च ते एप्रिलमध्ये हळूहळू ओसरू लागते.
झाडीपट्टीच्या या नाटकात झाडीपट्टीतील कलावंतांशिवाय मुंबई, पुणे, नागपूरचे शेकडो कलावंत, बाल कलावंतसुद्धा पाच ते सहा महिने येथे तळ ठोकून बसतात व लाखो रुपये कमवून जातात. झाडीपट्टी नाटकांच्या प्रेक्षकांचा वाढता कल बघता मागील २२ वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, वडसा, सिंदेवाही, नवरगाव येथे अनेक नाट्यमंडळ निर्माण झालीत. आणि हळुवार वडसा देसाईगंज हे नाट्य मंडळांचे मुख्य केंद्रस्थान बनले. येथूनच नाटकांच्या तारीख बुकिंग होतात.
मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्य शासनाने नाटकांवर बंदी घातली आणि नाट्य मंडळे, नाट्यकलावंत आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. मात्र, नाट्यक्षेत्रातील मंडळींनी संघर्षशील राहून सतत लढा दिला आणि एकदाची या वर्षात शासनाने परवानगी दिली. दरम्यान, चारही जिल्ह्यांत दिवाळीच्या महापर्वात नाटकांना दमदार सुरुवात झाली आहे. प्रेक्षकही दाद देऊ लागले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत