Top News

ग्रामसभेच्या माध्यमातुन आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करण्याची गरज #Chamorshi

संवर्ग विकास अधिकारी मुरुगनंतन यांचे प्रतिपादन

मुतनुर देवस्थान सभागृहात पेसा ग्रामसभेचे आयोजन
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- अनुसूचित जमात व अनुसूचित क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आणि आदिवासींची रूढी, प्रथा, परंपरा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व तीचे संवर्धन करण्यासाठी पेसा कायदा अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे असे प्रतिपादन चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास व आय ए एस अधिकारी मुरुगनंतम यांनी केले पंचायत समिती चामोर्शी व ग्रामपंचायत पाविमुरांडा यांच्या संयुक्त विद्यमाने मुतनुर येथील देवस्थान सभागृहात सामूहिक वनहक्क मान्यताप्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करणे, अनुसूचित क्षेत्राचा विस्तार कायद्याची अंमलबजावणी करणे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी सामूहिक वनहक्कांसाठी दावा करण्याबाबत चर्चा करणे व अध्यक्षाच्या परवानगीने येणारे विषयावर पेसा अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सभेला अध्यक्ष म्हणून गाव पाटील शत्रूजी नरोटे हे होते उद्घाटक म्हणून सरपंचा माधुरी आतला ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे, उपसरपंच विनोद कोंदामी,विस्तार अधिकारी काळबांधे, पेसा वनहक्क समन्वयक कल्पना मशाखेतरी, माजी सरपंच भाऊराव कुमरे, कालिदास आतला, जीवन कुमरे,ग्रामसेवक भारत सरपे, मुरखळा येथील ग्रामविकास अधिकारी वाय. वाय. मुळे, मुरमुरी येथील ग्रामसेवक प्रवीण रामटेके, ग्रामसेवक कासर्लावार आदी उपस्थित होते.
संवर्ग विकास अधिकारी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की आदिवासी संस्कृतीचा उगम मुळात निसर्गाच्या सानिध्यातू झाला असल्यामुळे, आदिवासी संस्कृती निसर्ग निर्मित आहे. ही संस्कृती एकमेकांच्या भावना,एकमेकांचे विचार समजून घेत असून, या संस्कृतीमध्ये आदिवासींचे खरे रूप दडले आहे .अनुसूचित क्षेत्राचा विकास होण्यासाठी पेसा कायदा अमलात आला आहे. या कायद्याद्वारे पाडे वस्त्यांचे गावात रूपांतर करणे, रूढी परंपरा जतन करणे, स्वतंत्र ग्रामसभा तयार करणे, लाभार्थी निवडणे, योजना कार्यक्रम प्रकल्पास मंजुरी देने, ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र देने, गौण वनोपजाचे लिलाव करणे लघु जलसिंचन आणि मासेमारीस परवानगी देने, जमीन अधिग्रहणापूर्वी सल्ला मसलत करणे, बाजार व्यवस्थापण, संस्थेवर नियंत्रण ठेवणे, अर्थसंकल्प आणि आदिवासी उपाययोजना अनुसूचित जमातीच्या जागा ठरवणे आदी अधिकार पेसा कायदा अंतर्गत पंचायती व ग्रामसभांना प्रदान करण्यात आले आहे , पेसा ग्रामसभांनी या अधिकाराचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आव्हान देखील संवर्ग विकास अधिकारी मुरुगनंतम यांनी पेसा क्षेत्रातील नागरिकांना केले आहे. याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी यांनी मुतनुर देवस्थानाची सखोल माहिती जाणून घेतली,देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यात येऊन पेसा ग्रामसभेच्या माध्यमातून देवस्थानाचा विकास करण्याचे आश्वासन दिले. आदिवासी रेला गीत व रेला नृत्याने पाहुणे भारावून गेले , सभेचे संचालन व आभार पाविमुरांडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा ग्रामसभेचे सचिव भारत सरपे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने