Accident News: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन सख्खे भाऊ ठार!

Bhairav Diwase
गडचिरोली:- आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे भाऊ जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरापासून एक किमी अंतरावर आरमोरी मार्गावरील प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ घडला. पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे (वय, ३८), अंकुश बाबुराव बारसागडे (वय, ३२) रा. विसापूर रोड, गडचिरोली असे मृतकांची नावे आहेत. धान्य पिकाला रोग लागल्याने कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पुरषोत्तम व अंकुश दोघेही भाऊ एकाच दुचाकीने कठाणी मार्गावर असलेल्या शेतात गेले. फवारणीचे काम आटोपून ते दुचाकीने घराकडे परत येत होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.


घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही जीव गेला. गडचिराेली शहरापासून अपघात एक किमी अंतरावर सदर अपघात घडला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. ट्रक चालक महेश माणीक पुरी (वय, ३२) रा. चंद्रपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.एमएच ३४ बीजी ८६५७ क्रमांकाच्या ट्रक गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात होता. तर, एमएच ३३ आर ७७८९ क्रमांकाच्या दुचाकीने पुरुषोत्तम व अंकुश हे दाेघेही भाऊ परत येत होते. प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात पुरुषोत्तम व अंकुश हे दोघेही जागीच ठार झाले. नियंत्रणाबाहेर गेलेला ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला गेला.