Chandrapur police Bharati: चंद्रपूर पोलीस भरतीचा थरार! २१५ जागांसाठी परिक्षेला सुरूवात!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीचा 'काऊंटडाऊन' अखेर संपला असून, आज २१५ रिक्त पदांसाठी लेखी परीक्षेचा महासंग्राम सुरू झाला आहे. मैदानी चाचणीत आपल्या कष्टाचा घाम गाळल्यानंतर, आता २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या रणांगणात उतरले आहेत.
या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने दोन महत्त्वाची केंद्रे निश्चित केली आहेत. पुरुष उमेदवारांसाठी 'राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज' येथे केंद्र देण्यात आले असून, एकूण १५६८ पुरुष उमेदवार तिथे आपली बुद्धिमत्ता पणाला लावणार आहेत.


तर दुसरीकडे, ७५३ महिला उमेदवारांसाठी 'सरदार पटेल महाविद्यालय' हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. पहाटेपासूनच उमेदवारांनी आपल्या केंद्रावर हजेरी लावण्यास सुरुवात केली होती.


परीक्षा पारदर्शक आणि चोख व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने कोणतीही कसर सोडलेली नाही. बायोमॅट्रिक हजेरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आणि केंद्राबाहेर तैनात असलेला मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे ही परीक्षा 'हायटेक' सुरक्षेत पार पडत आहे.