Accident News: सुधारित:::: गडचिरोली-आरमोरी मार्गावर अपघात

Bhairav Diwase

C-60 पथकाचे बुलेटप्रूफ वाहन आणि टिप्परची जोरदार धडक!
गडचिरोली:- गडचिरोली-आरमोरी मार्गावर सी-६० पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला एका भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने पथकातील सर्व जवान सुरक्षित असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली-आरमोरी मार्गावर सध्या रस्ते बांधकामाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी गिट्टी खाली करून एक रिकामी टिप्पर पाचगावच्या दिशेने परतत होता. दरम्यान, अचानक समोर आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टिप्पर चालकाने वाहन उजव्या बाजूला वळवले. मात्र, याच वेळी समोरून सी-६० पथकाचे बुलेटप्रूफ वाहन येत होते. वेगात असलेल्या टिप्परची या पोलीस वाहनाला भीषण धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, C-६० वाहनाचा मागील टायर जागीच फुटला. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल शेतात उतरले.


सुदैवाने, वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे आणि चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे वाहनातील कोणत्याही जवानाला गंभीर दुखापत झाली नाही. सर्व जवान सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.