Chandrapur News: चंद्रपूर महापालिका: सभापती पदासाठी काँटे की टक्कर; निकाल 'ईश्वर चिठ्ठी'वर अवलंबून?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महापालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आता थेट सामना रंगणार आहे. सोमवारी (दि. १६) होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी गटाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक वसंता देशमुख यांनी तर सत्तारूढ गटाकडून भाजप व उद्धवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांकडे प्रत्येकी ८-८ असे संख्याबळ असल्याने निकाल ईश्वर चिठ्ठीची शक्यता बळावली आहे.

महापालिका स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून, सत्तारूढ गटात भाजपचे ६ आणि उद्धवसेनेचे २ सदस्य आहेत. दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेसचे ७ तर मित्रपक्ष भाशेकापचा १ सदस्य आहे. असे समसमान संख्याबळ आहे. यापूर्वी उपमहापौर पदाची निवडणूकही ईश्वर चिठ्ठीतूनच झाली होती. त्यावेळी नशिबाने उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यावेळीही राजकीय समीकरणांपेक्षा नशिबाचा फेरा निर्णायक ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.