घरगुती गॅसचा अवैध वापर उघड; व्यवसायिकावर गुन्हा दाखल
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या दाताळा रोडवरील साईराम मंगल कार्यालयात लग्नाची लगबग सुरू असतानाच प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारीवरून, अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता भर लग्नात धाड टाकली.
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनविणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावर पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने लग्न मंडपातच धाड टाकून सहा घरगुती सिलिंडर जप्त केल्याची धक्कादायक घटना घडली असून कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी (४२) यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील दाताळा रोडवरील रामसेतू पुलाजवळील साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी चंद्रपूर शहर सुमेर चवरे, राहुल वानखडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. यावेळी एकूण ६ घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी संबंधित व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्यावसायिक कारणांसाठी घरगुती सिलेंडर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

