Chandrapur News: इको-प्रोचे बंडू धोतरे यांचे १० दिवसांचे अन्नत्याग आंदोलन यशस्वी

Bhairav Diwase
आंदोलनस्थळी भेट; लिंबू सरबत पाजून सोडविले उपोषण
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष निवारणासाठी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेला सत्याग्रहाचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी पुकारलेले आंदोलन आज शासनाच्या सकारात्मक निर्णयानंतर मागे घेण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा लोहाडोंगरी येथील प्रस्तावित लोहखाण प्रकल्पाविरोधात आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या १६ प्रलंबित मागण्यांसाठी ५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंडू धोतरे सत्याग्रहावर बसले होते. आज या आंदोलनाचा १० वा दिवस होता. आंदोलनाची तीव्रता आणि जनभावना लक्षात घेता, राज्य शासनाने अखेर नमती भूमिका घेतली आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज स्वतः आंदोलनस्थळी भेट दिली. शासनाचे अधिकृत पत्र घेऊन ते बंडू धोतरे यांच्याशी चर्चेसाठी पोहोचले. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, ६ जानेवारी २०२६ रोजी राज्य वन्यजीव मंडळाने लोहाडोंगरी खाणीला दिलेली शिफारस तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर ही शिफारस कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.


मानव-वन्यजीव संघर्षाच्या इतर मागण्यांबाबतही वन मंत्र्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. या आश्वासनानंतर, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन बंडू धोतरे यांनी आपले उपोषण सोडले. हा विजय केवळ एका संस्थेचा नसून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल आणि वन्यजीव प्रेमींचा मानला जात आहे.