मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावरील संतापजनक प्रकार
चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेला लागून असलेल्या मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर पर्यटकांच्या बेजबाबदारपणाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिनांक १५ मार्च २०२६ रोजी काही पर्यटकांनी चक्क रस्त्यावर वाहने थांबवून वाघाचा रस्ता अडवला आणि वाहनातून खाली उतरून वाघाचा पाठलाग करत व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत वनविभागाने तत्काळ वनगुन्हा क्रमांक ०९६५४/२११३३३ नोंदवला आहे. भारतीय वन अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाची कारवाई:
ज्या वाहनांनी वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण केला, ती वाहने शोधून जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संतोष थिपे स्वतः करीत आहेत.
नागरिकांना आवाहन:
वनविभागाने आवाहन केले आहे की, जर कुणाकडे या आरोपींविषयी माहिती असेल, तर त्यांनी ९८३४६८९५४१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा कृत्यामुळे मानवी जीवावरही बेतू शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

