प्रोटोकॉलचा फज्जा: खासदार प्रतिभा धानोरकर संतापल्या; मनपा आयुक्ताविरुद्ध थेट दिल्लीत तक्रार!
चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाविरुद्ध थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शासकीय कार्यक्रमात महिला खासदाराचा अवमान करण्यात आल्याचा आणि संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
तारीख २० एप्रिल २०२६. ठिकाण चंद्रपूर. निमित्त होते आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित 'राजमाता राणी हिराई जन्मोत्सव' कार्यक्रम. पण या शासकीय सोहळ्यात लोकशाही मूल्यांना हरताळ फासल्याचा आरोप आता स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक राजशिष्टाचाराचे उल्लंघन केले. 'ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स'नुसार खासदारांचा दर्जा आणि क्रम ठरलेला असताना, त्यांचे भाषण घाईघाईत उरकून घेण्यात आले आणि त्यानंतर शिष्टाचारामध्ये नसलेल्या स्थानिक नेत्यांना भाषणाची संधी दिली गेली.
खासदारांचे अधिकृत भाषण सुरू असताना एका आमदाराला वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे खासदारांना आपले भाषण थांबवावे लागले.
भाषण थांबवले: खासदारांचे अधिकृत भाषण सुरू असताना एका आमदाराला वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे खासदारांना आपले भाषण थांबवावे लागले.
राजकीय मेळावा: शासकीय निधीतून होणाऱ्या कार्यक्रमाचे रूपांतर एका विशिष्ट पक्षाच्या खाजगी मेळाव्यात करण्यात आले.
दुय्यम वागणूक: निमंत्रण पत्रिकेत नाव नसलेल्या कार्यकर्त्यांचा मंचावर वावर होता आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणासाठी खासदार धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना जबाबदार धरले आहे. महिला लोकप्रतिनिधीला दुय्यम वागणूक देणे हा केवळ शिष्टाचार भंग नसून, संसदीय लोकशाहीवर केलेला आघात असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आता हे प्रकरण लोकसभेच्या 'विशेषाधिकार समिती'कडे (Privilege Committee) वर्ग करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. आता यावर लोकसभा सचिवालय काय पाऊल उचलते आणि चंद्रपूरच्या प्रशासकीय गोटात याचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


