चंद्रपूर:- शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडी येथे घडली. ब्रम्हपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीमध्ये तो शिकत होता. ईशान सत्यपाल आत्राम असे या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी उठला होता. आंघोळ आटोपून तो शाळेचा गणवेश परिधान करून तयारी करत असतानाच सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला. पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांनी त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इतक्या कमी वयात हृदयविकाराचा झटका आल्याने सारेच अवाक झाले आहेत.


