पत्रकार परिषदेत कुलगुरूंचे स्पष्टीकरण!
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसून, ती पूर्णतः चुकीची आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात गैरसमज निर्माण होत असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी या आरोपांचे खंडन केले.
नियमित प्रक्रियेला 'संशयाचा' रंग:
विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकन विभाग हा अत्यंत गोपनीय असतो. दररोज कामकाज संपल्यानंतर संबंधित कक्ष सील करणे आणि दुसऱ्या दिवशी तो उघडणे ही एक नियमित सुरक्षा प्रक्रिया आहे. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी या सामान्य प्रशासकीय प्रक्रियेला 'गंभीर प्रकार' किंवा 'संशय' अशा शब्दांत प्रसिद्ध करून दिशाभूल केली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
संभाव्य धोका टाळण्यासाठी दक्षता:
मूल्यांकन केंद्रावर अनियमितता सुरू असल्याची केवळ 'चर्चा' ऐकायला मिळाल्यानंतर, विद्यापीठ प्रशासनाने भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलली. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून कामकाज अधिक पारदर्शक केले. चौकशीअंती कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आला नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
कंत्राटी कर्मचारी आणि विद्यापीठाचे अधिकार:
कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती किंवा सेवा समाप्त करणे हा विद्यापीठाचा वैधानिक अधिकार आहे. या निर्णयाचा 'गुणवाढीच्या' कथित प्रकाराशी संबंध जोडणे चुकीचे आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय 'विद्यार्थ्यांशी सलगी' किंवा 'गुप्तता' यांसारखे आरोप करणे हे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे.
गोंडवाना विद्यापीठ आपले उद्दिष्ट वेळेत साध्य करण्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून, राज्य शासनानेही याची दखल घेतली आहे. अशा परिस्थितीत तथ्यहीन चर्चा करून अडथळे निर्माण करू नये, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे उपस्थित होते.

