चंद्रपूर:- चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचं पर्यवसान थेट हत्येत झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. यश फाले नावाच्या २५ वर्षीय तरुणाची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे.
घटनेचं कारण होतं अगदी क्षुल्लक! कोयना गेट परिसरातील नाश्ता आणि लस्सी सेंटरचे मालक प्रफुल महाराणे आणि यश यांच्यात बुधवारपासून वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळला आणि प्रफुलने संतापाच्या भरात बर्फ फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'नोकुली' या धारदार हत्याराने यशच्या पोटात खोलवर वार केला.
हा वार इतका भीषण होता की, यशचा जागीच मृत्यू झाला. या झटापटीत आरोपी प्रफुल देखील जखमी झाला असून सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई वेगाने सुरू आहे.


