चंद्रपूर:- सावकारी पाश किती जीवघेणा असू शकतो, याचं विदारक वास्तव चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलं आहे. कर्जबाजारीपणामुळे कंबोडियात जाऊन आपली किडनी विकण्याची वेळ आलेल्या एका शेतकऱ्याने, आता थेट 'इच्छामरणाची' परवानगी मागितली आहे. "न्याय मिळत नसेल तर जगून काय करू?" असा आर्त सवाल या शेतकऱ्याने प्रशासनाला विचारला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे, ही आज एका व्यवस्थेच्या अपयशाची ओळख बनली आहे. अवैध सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात रोशन इतके अडकले की, त्यांना स्वतःची किडनी विकण्यासाठी कंबोडिया गाठावं लागलं. हे प्रकरण समोर आल्यावर संपूर्ण राज्यात चर्चा झाली, मात्र आजही रोशन यांच्या वाट्याला फक्त संघर्षच आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कडक आदेश दिले होते. मात्र, दीड महिना उलटूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप रोशन कुडे यांनी केला आहे. ज्या शेतीवर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, ती शेती आजही त्यांच्या हातात नाही.
"मी गेल्या चार महिन्यांपासून न्यायासाठी फिरतोय. माझी शेती गेली, माझं शरीर खचलंय. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण इथे अधिकारी काहीच करायला तयार नाहीत. जर मला माझी शेती आणि न्याय मिळणार नसेल, तर मला आता जगण्यात रस नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मला इच्छामरणाची परवानगी द्यावी."शेतकरी रोशन कुडे

Social Plugin