नागभीड:- मजुरीचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादात ठेकेदाराने केलेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना नागभीड येथे उघडकीस आली. गुरुवारी दि. ९ एप्रिलला घडलेल्या या घटनेनंतर जखमी मजुराचा सोमवारी दि. १३ एप्रिलला गडचिरोली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगेश अरुण सेलोटे (रा. म्हसली) हा ठेकेदारीचे काम करतो. त्याच्याकडे यशुदास माणिक चुधरी (४०) हा मजूर म्हणून काम करत होता. यशुदास याचे काही मजुरीचे पैसे थकीत होते. ते मागण्यासाठी तो गुरुवारी ठेकेदाराकडे गेला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. ठेकेदार मंगेश सेलोटे याने केलेल्या मारहाणीत यशुदास चुधरी गंभीर जखमी झाला. या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर येत आहे. जखमीला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मंगेश सेलोटे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे व त्यांचे पथक करीत आहे.


