Chandrapur News: "जमिनीसाठी मृत्यूशी झुंज! पाचही आदिवासी शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर; आमदारांकडून विचारपूस

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जमिनीच्या न्याय मोबदल्यासाठी चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.


माणिकगड सिमेंट प्रकल्पासाठी कोरपना तालुक्यातील कुसुंबी गावच्या १९ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा किंवा जमिनी परत मिळाव्यात, यासाठी हे शेतकरी लढा देत आहेत.


शासन दरबारी वारंवार चकरा मारूनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या लचु आत्राम, जयराम कुळमेथे, जंगु पेंदोर, बालाजी सिडाम आणि मारोती तलांडे या पाच शेतकऱ्यांनी काल थेट एसडीओ कार्यालयात विष प्राशन केले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने या पाचही शेतकऱ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी रुग्णालयात पोहोचून शेतकऱ्यांच्या आरोग्याची विचारपूस केली.