Chandrapur News: लग्नघरात काळाचा घाला: भावाच्या रिसेप्शनपूर्वीच बहिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhairav Diwase
नागभीड:- नागभीड काळ आणि वेळ कधीही सांगून येत नाही, याची हृदयद्रावक प्रचिती नागभीड येथे सोमवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता आली. भावाच्या लग्नासाठी आनंदाने आलेल्या बहिणीचा स्वागत समारंभाच्या तयारीदरम्यान विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी जिथे जिथे हर्षोल्हासाचे वातावरण होते, तिथे अचानक शोककळा पसरली.


स्नेहा विशाल वरभे (वय ३८, रा. भद्रावती) असे या मृत बहिणीचे नाव आहे. नागभीड येथील तिचा भाऊ अक्षय बाबुराव कायरकर यांच्या लग्नासाठी ती मोठ्या उत्साहाने भद्रावती येथून आली होती. रविवारी ब्रह्मपुरी येथे लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर सोमवारी नागभीड येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. घरात लग्नानंतर आनंदाचे स्वागत वातावरण होते.


समारंभाच्या तयारीत सर्वजण व्यस्त होते. त्यात स्नेहाही मदत करत होती. याचवेळी घराच्या गल्लीत काही काम करत असताना तिच्या हाताचा स्पर्श विद्युत वायरला झाला आणि तिला जोरदार विजेचा धक्का बसला. काही क्षणातच ती जमिनीवर कोसळली. नातेवाइकांनी तात्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले.


प्रकृती गंभीर असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लग्नघरातील आनंद क्षणात दुःखात बदलला.

लग्नसोहळ्याच्या तयारीत घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. स्वागत समारंभासाठी नातेवाइकांची लगबग सुरू होती. मात्र क्षणात घडलेल्या दुर्दैवी घटनेने घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.