Accident News: लग्नाचा आनंद विरला; रानडुकरांच्या कळपामुळे पिकअप उलटून १२ जण जखमी!

Bhairav Diwase
कोरपना:- लग्नाचे कार्य आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या रानडुकरांच्या कळपामुळे पिकअप वाहन उलटून भीषण अपघात घडला आहे. कोरपना तालुक्यातील चनई बुज – खैरगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. हातलोणी येथील नागरिक एका लग्नकार्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण पिकअप वाहनाने आनंदाने घरी परतत होते. मात्र, चनई बुज परिसरात अचानक रानडुकरांचा एक मोठा कळप रस्त्यावर आडवा आला.


वेगात असलेल्या वाहनासमोर अचानक प्राणी आल्याने चालकाची तारांबळ उडाली. डुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरात ब्रेक दाबला, ज्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव पिकअप रस्त्याच्या मधोमध उलटली. एकूण १२ प्रवासी जखमींपैकी ६ जण गंभीर जखमी असून अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. उर्वरित ६ जखमींवर कोरपना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.