वरोरा:- वरोरा येथील मारडा रोडवर असलेल्या 'रवीकमल जिनिंग'मध्ये आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा पांढरा कापूस जळून खाक झाला आहे.
दुपारी जिनिंगमध्ये कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र, अचानक कापसाच्या ढिगाऱ्यातून धूर निघू लागला. हवेमुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आगीची भीषणता एवढी होती की संपूर्ण परिसराला आगीने कवेत घेतले.
आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा कापूस जळून कोळसा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरोरा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशी लागली अद्याप कळलेले नाही.


