Chandrapur News: चंद्रपूर महापालिकेत 'ईश्वरचिठ्ठी'चा कौल; दोन्ही 'देशमुख' निवडणुकीत पराभूत!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा 'ईश्वरचिठ्ठी'नेच निकाल स्पष्ट केला आहे. विशेष म्हणजे, या चिठ्ठीने पुन्हा एकदा 'देशमुख' आडनावाच्या उमेदवाराला पराभवाचा झटका दिला आहे.


१६ मार्च रोजी पार पडलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (उबाठा) युतीकडून मनस्वी गिऱ्हे, तर काँग्रेसकडून वसंत देशमुख रिंगणात होते. दोन्ही बाजूंनी मतदान झाले असता ८-८ असे समान संख्याबळ मिळाल्याने शेवटी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात नशिबाने मनस्वी गिऱ्हे यांना साथ दिली आणि त्या विजयी घोषित झाल्या.


हा योगायोग आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण १० फेब्रुवारीला झालेल्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही असाच पेच निर्माण झाला होता. तेव्हा ३२-३२ अशा समान मतांमुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली होती. त्यावेळेस भाजप-शिवसेना (उबाठा) युतीचे प्रशांत दानव विजयी झाले होते आणि काँग्रेस-भाशेकाप गटाचे पप्पू देशमुख यांना पराभव पत्करावा लागला होता.


उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख आणि आता स्थायी समिती सभापती पदासाठी वसंत देशमुख, अशा दोन्ही दिग्गज 'देशमुखांना' ईश्वरचिठ्ठीने नाकारल्याची चर्चा आता संपूर्ण चंद्रपूर शहरात रंगू लागली आहे. महापालिकेत भाजप-शिवसेना (उबाठा) युतीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं, तरी नशिबाच्या या खेळामुळे विरोधकांना मात्र मोठा धक्का बसला आहे.