Top News

शिवसेनेचे पप्‍पु बोपचे यांचा शेकडो सहका-यांसह भाजपात प्रवेश.

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या एकात्‍म मानववादाचा विचार जनाजनापर्यंत पोहचवा:- आ. सुधीर मुनगंटीवार

कार्यकर्ता हा पक्षाचा आत्‍मा

चंद्रपूर महानगरातील बुथ प्रमुख व शक्‍तीकेंद्र प्रमुखांचे सम्‍मेलन उत्‍साहात संपन्‍न
चंद्रपूर:- भारतीय जनसंघाचे संस्‍थापक व एकात्‍म मानववादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांनी एकात्‍म मानववादाचा विचार भारतीयांसमोर मांडला. भारतीय जनसंघाची स्‍थापना करत सक्षम राजकीय पक्षाचा पर्याय देशासमोर ठेवला. आज भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातुन देशाला बलशाली करण्‍यासाठी सज्‍ज असलेल्‍या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्‍मा आहे. पंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांचा एकात्‍म मानववादाचा विचार जनाजनाच्‍या मनामनापर्यंत पोहचविण्‍याची जबाबदारी आम्‍हा कार्यकर्त्‍यांवर आहे. पक्षाला अधिक सशक्‍त करण्‍यासाठी बुथ मजबुत करण्‍याचे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे हॉटेल एनडी चंद्रपूर समोरील पटांगणात पंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या पुण्‍यतिथीनिमीत्‍त बुथप्रमुख व शक्‍तीकेंद्र प्रमुखाचे सम्‍मेलन आयोजित करण्‍यात आले होते. या सम्‍मेलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती संदीप आवारी, महानगर जिल्‍हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महिला आघाडी महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, देवानंद वाढई, सौ. जयश्री जुमडे, अरूण तिखे, सुरेश तालेवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या पुण्‍यतिथीनिमीत्‍त प्रत्‍येक बुथवर समाजातील १० महत्‍वपूर्ण व्‍यक्‍तींचा प्रवेश भाजपात करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला ही अतिशय महत्‍वाची बाब आहे. या माध्‍यमातुन ४ हजार पेक्षा जास्‍त समाजसेवक भारतीय जनता पार्टीत दाखल झाले आहेत. या सर्वांचा आम्‍ही यथोचित सन्‍मान करू. शहरातील प्रत्‍येक बुथ भाजपामय होईल असा प्रयत्‍न कार्यकर्त्‍यांनी करण्‍याची आवश्‍यकता आहे. बुथ सशक्‍त करण्‍यासाठी सोशल मिडीयाच्‍या शक्‍तीचा योग्‍य उपयोग केल्‍यास अधिक सहाय्यभूत ठरेल. सेवा उपक्रम तसेच संघर्षाच्‍या माध्‍यमातुन संघटन अधिक बळकट करण्‍यावर भर देण्‍याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेनेचे श्री. पप्‍पु बोपचे यांनी त्‍यांच्‍या शेकडो सहका-यांसह भाजपात प्रवेश घेतला. नवप्रवेशित कार्यकर्त्‍यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात आला. या सम्‍मेलनाचे औचित्‍य साधुन ‘मन की बात’ के संयोजक डॉ. दिपक भट्टाचार्य, उत्‍कृष्‍ट शक्‍तीकेंद्र प्रमुख म्‍हणुन सागर भगत, उत्‍कृष्‍ट बुथप्रमुख म्‍हणुन प्रणिता कोसे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. बुथ क्र. ३१२ चे प्रमुख शहनवाज शेख यांचा विशेष पुरस्‍कार देवून सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री ब्रिजभूषण पाझारे यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र गुरनुले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भारती दुधानी आणि डॉ. दीपक भट्टाचार्य यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने