चंद्रपूर:- एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड्सच्या बसला नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे आपले कर्तव्य बजावून परतत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये साधारणपणे ४० ते ४५ होमगार्ड प्रवास करत होते. नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत बसचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये अनेक होमगार्ड जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासन सतत संपर्कात असून, होमगार्डच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, पोलीस प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात दिला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने या घटनेला दुजोरा दिला असून, जखमी होमगार्डवर योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आणि होमगार्ड कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

