Chandrapur News: महापौरपदाचे आरक्षण ठरणार 'टर्निंग पॉईंट'; आरक्षण जाहीर झाल्यावरच गिऱ्हे आपली पत्ती उघडणार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचे गणित अद्याप स्पष्ट झालेले नाही. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसला 27, भाजपाला 23, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 6, जनविकास सेनेला 3, बहुजन वंचित आघाडीला 2, शिंदे शिवसेना, एमआयएम व बसपाला प्रत्येकी 1 तर अपक्ष 2 नगरसेवक आहेत.


काँग्रेस व जनविकास सेनेची युती असल्यामुळे आकड्यांचा एकूण मिळून 30 चा टप्पा गाठला जात असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत श्रेयवादाच्या लढाईमुळे पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे. या गटबाजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असून त्याचा फायदा कोणाला होणार, हे येणारा काळ ठरवेल.


भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे स्वतंत्र बहुमताचा आकडा नसल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व बहुजन वंचित आघाडीची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी महापौर पद आरक्षित झाल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिकच उघड झाले असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना भ्रमंतीवर पाठवले असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीने आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी ठेवत खबरदारी घेतली आहे.
भाजपानेही सत्तास्थापनेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले असून आकडेमोडीची राजकीय खेळी रंगली आहे. स्पष्ट बहुमताअभावी चंद्रपूरचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत अद्यापही गूढ कायम आहे.