पाटील, भावसार,भाकरे, डांगे, मुळे, बोरकर, सलाम आणि नागदेवते मानकरी
चंद्रपूर:- सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२४ करिता संस्थेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. कथासंग्रहासाठी दिला जाणारा प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार डॉ.सुवर्णा पाटील (जळगाव) यांच्या अभिनव कथा या कथासंग्रहाला, कवी शिवाजीराव चाळक पुरस्कृत कवितासंग्रह पुरस्कार किरण भावसार (नाशिक) यांच्या घामाचे संदर्भ या कवितासंग्रहाला, विमलबाई देशमुख स्मृती बालसाहित्य पुरस्कार गणेश भाकरे (सावनेर) यांच्या थेंबाथेंबाची कहाणी या बालकवितासंग्रहाला, डॉ . विद्याधर बनसोड पुरस्कृत ललित लेखन पुरस्कार निशा डांगे (पुसद) यांच्या कपाळ गोंदण या ललितलेखसंग्रहास, अशोकसिंह ठाकुर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार गायत्री मुळे (नागपूर) यांच्या वास्तुपुरुष या कादंबरीला देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील जिल्हास्तरीय नीता कोतंमवार स्मृती साहित्य सन्मान ज्येष्ठ इतिहासलेखक आणि संशोधक डॉ. र .रा बोरकर (गोंडपिपरी) यांना , डॉ. तु. वि . पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार चित्रकार आणि कलाशिक्षक भारत सलाम (मूल) यांना तसेच मिलिंद बोरकर स्मृती नवोन्मेष पुरस्कार युवा कलावंत आणि कवी आशिष नागदेवते (ब्रम्हपुरी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानवस्त्र, श्रीफळ, समानचिन्ह आणि सन्मानराशी असे आहे.
आज रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ ला स्थानिय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ नाट्य कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर प्रामुख्याने उपस्थित असतील.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर विदर्भातल्या गझलकारांचा गझल मुशायरा ज्येष्ठ कवी आणि गझलकार बबन सराडकर (अमरावती) यांच्या अध्यक्षतेत होणार असून अजिज पठाण (नागपूर) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. गजल मुशायऱ्यात अजय बोरकर, अर्जुमन शेख, दिलीप पाटील आणि सुनील बावणे सहभागी होतील. गझल मुशायऱ्याचे संचालन पुणे येथील युवा गझलकार पार्थ भेंडेकर करतील. तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून भंडारा येथील प्रख्यात कवी आणि चित्रकार प्रमोदकुमार अणेराव अध्यक्षस्थानी असतील. कवी संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवियत्री डॉ.पद्मरेखा धनकर, झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. धनराज खानोरकरआणि युवा कवी पुनीत मातकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. संचालन प्रसिद्ध निवेदक आणि कवी नरेशकुमार बोरीकर करतील. यावेळी जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेरील निमंत्रित कवी कविसंमेलनात सहभाग घेतील. पुरस्कार वितरण सोहळा, गझल मुशायरा आणि कविसंमेलनामध्ये जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
