Chandrapur police Bharati: चंद्रपूर पोलीस भरतीतील 'त्या' १२८२ उमेदवारांना १०० मीटर धावण्यासाठी शेवटची संधी!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या उमेदवारांनी ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मैदानी चाचणी दिली होती, परंतु काही कारणास्तव १०० मीटर धावण्याच्या फेरचाचणीला ते हजर राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांना पोलीस प्रशासनाने आता शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ अंतर्गत, ज्या पात्र उमेदवारांनी ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छाती व उंचीच्या निकषात पात्र ठरून १०० मीटर धावण्याच्या चाचणीत भाग घेतला होता, अशा उमेदवारांसाठी २२ फेब्रुवारी रोजी पुनश्च चाचणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या चाचणीला तब्बल १२८२ उमेदवार गैरहजर राहिले होते. आता या उर्वरित १२८२ उमेदवारांना प्रशासनाने पुन्हा एकदा आणि शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तारीख: फेब्रुवारी २८, २०२६: 
वेळ: दुपारी ०४:०० वाजता.
स्थळ: पोलीस मुख्यालय सराव मैदान, तुकुम, चंद्रपूर


प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जे उमेदवार २८ फेब्रुवारी रोजी देखील गैरहजर राहतील, त्यांना पूर्वी मिळालेले गुणच (११ ते १४ फेब्रुवारी दरम्यानचे) अंतिम मानले जातील. त्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.