Chandrapur News: काँग्रेसचे 'वारजुकर' कमळाच्या साथीला; जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसची धुरा सांभाळणारे 'वारजुकर कुटुंब' आता भाजपवासी झाले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजुकर यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अधिकृतपणे भाजपचे कमळ हाती घेतले आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशावेळी चिमूरचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्यासोबतच माजी आमदार नामदेवराव उसेंडी आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती ही भाजपची जिल्ह्यात वाढती ताकद अधोरेखित करत आहे.


काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यापासून वारजुकर भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले होते, त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. आता या राजकीय भूकंपाचे परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती महागात पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.