चंद्रपूर:- चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडले असून, जिल्ह्याचे वजनदार नेतृत्व मानल्या जाणाऱ्या वारजुकर कुटुंबाने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर वारजुकर कुटुंबाने आपला सामूहिक राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, काँग्रेसचे विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुकर आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजुकर यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक दशकांपासून काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या या कुटुंबाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वारजुकर कुटुंब हे काँग्रेसचे निष्ठावान मानले जात होते. त्यांच्या जाण्याने चिमूरमध्ये काँग्रेसची संघटनात्मक बांधणी खिळखिळी होण्याची शक्यता आहे. साईश वारजुकर हे युवक काँग्रेसचे महत्त्वाचे चेहरे होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील तरुण फळीवर याचा मोठा परिणाम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाल्याने, लवकरच हे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारजुकरांचे हे 'बंड' काँग्रेससाठी चिमूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात किती महाग पडणार, हे येणारा काळच ठरवेल.

