चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर आता सत्तेचा पेच अधिकच गहिरा झाला आहे. सत्तेच्या चाव्या हातात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण याच दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौर पदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. संदीप गिऱ्हे यांनी दिलेल्या एका संकेताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.
चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी एक मोठे विधान केले आहे. गिऱ्हे म्हणाले की, 'आता तडजोडीची वेळ संपली आहे. जो पक्ष आमचा महापौर करण्यास तयार असेल, आम्ही त्याच पक्षाला पाठिंबा देऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ.' या विधानाने महाविकास आघाडीत आणि युतीतही खळबळ उडवली आहे.
संदीप गिऱ्हे यांच्या या 'ओपन ऑफर'ला राज्याचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे संकटमोचक सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे. मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका मांडताना म्हटले आहे की, 'शिवसेना उबाठा गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद दिले जाणार नाही.' भाजप आपल्या संख्याबळाच्या जोरावर आणि मित्रपक्षांच्या मदतीने स्वतःचा महापौर बसवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. किंवा आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडू असेही त्यांनी सांगितले.

