Murder News: 'आरडी' एजंटची निर्घृण हत्या!

Bhairav Diwase
गडचिरोली:- गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (४९) या आरडी एजंटाचा सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. सिरोंचा रोडवरील नागमाता मंदिराजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण आलापल्ली परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक राजेंद्र तंगडपल्लीवार हे प्रगती पतसंस्था, आलापल्ली येथे आरडी (आवर्ती ठेव) जमा करण्याचे काम करायचे. १८ जानेवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास ते पतसंस्थेचे पैसे जमा करण्यासाठी जातो, असे घरी सांगून घराबाहेर पडले. मात्र, दुपारनंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येऊ लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने सतीश वामनराव कोलपाकवार यांनी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ मिसिंग नोंदवून शोध सुरू केला होता. मात्र, त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या केल्याचाच संशय व्यक्त केला जात असून उपअधीक्षक अजय कोकाटे, अहेरी ठाण्याचे पो.नि. हर्षल एकरे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अज्ञात आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.


सोमवारी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास नागमाता मंदिराजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तो मृतदेह राजेंद्र यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, राजेंद्र यांच्याकडील मोबाईल, जुनी दुचाकी आणि बँकेची पैसे डिपॉझिट करण्याची मशीन घटनास्थळावरून गायब आहे. त्यामुळे हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असावा, असा संशय बळावला आहे.


घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळ तातडीने सील केले असून 'फॉरेन्सिक' (न्यायवैद्यक) टीमला पाचारण करण्यात आली होती. घटनास्थळावरून काही पुरावे हाती लागतात का, यादृष्टीने तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान आहे.