Chandrapur News: एकीकडे देशसेवा, दुसरीकडे रुग्णवाहिका चालक म्हणतंय ‘हद्द संपली’!

Bhairav Diwase

‌जखमी होमगार्डला रुग्णवाहिकेतून भररस्त्यात उतरवले!

चंद्रपूर:- निवडणूक बंदोबस्ताचे कर्तव्य बजावून परतणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड्सवर काळाने घाला घातला आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे येथील बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे निघालेल्या होमगार्ड्सच्या बसला नांदेड जिल्ह्यातील माहूर-उनकेश्वर मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात साधारणपणे ४० ते ४५ होमगार्ड प्रवास करीत होते. यापैकी काही होमगार्ड गंभीर जखमी तर काही जखमी झाले आहेत.


अपघाताची भीषणता आणि मोठी हानी:

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात सुरज गेडाम या जवानाने आपला पाय गमावला आहे. इतर अनेक जवानांना गंभीर दुखापत झाली असून कुणाचे हात-पाय मोडले आहेत, तर कुणाच्या डोक्याला आणि कमरेला जबर मार बसला आहे.


प्रशासनाचा संतापजनक चेहरा:

या दुर्घटनेनंतर मदतीऐवजी प्रशासनाचा अत्यंत निर्दयी चेहरा समोर आला आहे. पथकातील जखमी होमगार्ड सैनिक मंगेश नारायण मांदाळे (स.क्र. १५३५) यांना कमरेला मार लागल्याने साधे बसण्याचीही क्षमता नव्हती. उमरी बाजार (ता. किनवट) येथील प्राथमिक केंद्राच्या रुग्णवाहिकेने त्यांना केवळ केळापूरपर्यंत आणले आणि "आमची हद्द संपली" असे सांगून या गंभीर जखमी होमगार्ड सैनिकाला भररस्त्यात उतरवून दिले. अखेर सहकाऱ्यांनी एका खासगी ट्रॅव्हल्सच्या शेवटच्या सीटवर टाकून मंगेशला घरी आणले. सरकारी रुग्णवाहिकेच्या या भूमिकेबद्दल आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा:


आज चंद्रपूर येथील होमगार्ड्सनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांनी संपूर्ण घटनेचा पाढा वाचला. तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांची माहिती दिले.


"जखमी जवानांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, उपचाराचा खर्च शासनाने करावा आणि दोषींवर कारवाई व्हावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा होमगार्ड्सनी यावेळी दिला आहे.