'डेमू'ला विसापूरला थांबवायला हरकत काय? #Ballarpur #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- मागील तीन महिन्यांपासून बल्लारशाह ते गोंदिया आणि बल्लारशाह ते वर्धा अशी डेमू व मेमू ट्रेन सुरू झाल्याने ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त व हक्काचे प्रवासाचे साधन मिळाले आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात आजही बल्लारशाह- गोंदिया डेमू ट्रेन थांबत नाही व वर्धा मेमूचा तांत्रिक थांबा असूनही ट्रेनचे तिकीट मिळत नसल्याने त्यांना अजूनही चंद्रपूर किंवा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड व गैरसोयींमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रेल्वे थांबा देण्यात यावा, तिकीट घर सुरू करण्यात यावे, तसेच पूर्वी डेमू व मेमू रेल्वेशिवाय जादा पॅसेंजर गाड्या सोडण्यात याव्या, याबाबतचा पाठपुरावा माजी खासदार हंसराज अहिर यांनी करावा, अशी विनंतीपर मागणी भाजपा युवा उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे, रेल्वे तिकीट कंत्राटदार चंद्रशेखर गिरडकर यांनी गावकऱ्यांमार्फत त्यांना केली होती. यापैकी डेमू ट्रेनचा थांबा चांदा फोर्टसमोर प्रत्येक लहान खेड्यातील हॉल्ट स्टेशनवर देण्यात आला आहे. फक्त विसापूरलाच सावत्रपणाची वागणूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
पूर्वी विसापूर येथे तांत्रिक थांबा देण्यात आला होता व येथून थेट तिकीटसुद्धा मिळत होती. कोरोनाचा प्रकोप वाढला, तेव्हा पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. तेव्हापासून तिकीटघरसुद्धा बंद झाले. आता पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू होत आहे. मात्र विसापूर येथील रेल्वे तिकीट घर व गोंदिया गाडीचा थांबा बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.
पॅसेंजर गाड्या म्हणजे आवडते प्रवास साधन

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पॅसेंजर गाड्या जीवनवाहिनी आहे. स्वस्त आणि सुलभ प्रवास सुविधेमुळे ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी यातूनच प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन ऐवजी मेमू आणि डेमू गाड्या सुरू केल्या आहेत. डेमू गाडी बल्लारशाह ते गोंदिया आणि मेमू बल्लारशाह ते वर्धा धावत आहेत. यापैकी एक गाडी येथे थांबत नाही तर दुसरीची तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्या सुरू होऊनही त्याचा काहीच फायदा गावकऱ्यांना होत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत