स्टार्स प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण संपन्न #chandrapurचंद्रपूर:- मागील वर्षी मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला होता. त्यानुसार शैक्षणिक सत्र 2023 - 24 मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या बालकांची शाळा पूर्व तयारी झालेली असते, त्या बालकांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक चांगली दिसून येते. त्या दृष्टीने इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शाळा पूर्वतयारी होऊन शाळेच्या पहिल्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे, याकरिता या उपक्रमाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. शाळेत दाखल पात्र मुलांना शाळा , शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, शाळेची त्यांना भीती वाटू नये, शिक्षक आणि शाळेशी ते समरस व्हावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे 2023-24 या शैक्षणिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळा पूर्वतयारी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जाणार आहेत. दरम्यान शाळानिहाय माता पालक गट तयार करून मेळावेही घेण्यात येत आहे. तरी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा, शिक्षक, मुख्याध्यापक व महिला व बालकल्याण विभागांतर्गत सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका व
अंगणवाडी सेविका यांनी या उपक्रमात सहभागी होऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या शाळेची पूर्वतयारी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत श्री. राजकुमार हिवारे, प्राचार्य डायट चंद्रपूर यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणात मांडले.
➡️

तालुकास्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी डायट चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. यात चंद्रपूर, बल्लारपूर व भद्रावती तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ज्यामध्ये शिक्षक, केंद्रप्रमुख व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश होता.
➡️

यावेळी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. धनंजय चापले यांनी प्रशिक्षणाचे स्वरूप, उद्देश व मेळाव्यानंतर आठ आठवडे मातांच्या मदतीने दाखलपात्र विद्यार्थ्यांची तयारी कशी करायची? मानवी मेंदूचा 85% विकास हा वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होत असतो यामुळे या कालखंडामध्ये बालकांचे भाव विश्व संपन्न होणे खूप गरजेचे असते,यासाठी ECCE चे आवश्यकता यावर मार्गदर्शन केले.
➡️

मेळावे कसे घ्यायचे? मेळाव्यासाठी राज्यस्तरावरून पाठवण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करायचा? लीडरमातांना कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल? आठ आठवडे माता दाखल पात्र विद्यार्थ्यांसोबत कोणकोणत्या कृती करून घेतील ? यावर तज्ञ सुलभक संगिता कामडी, माया वाठोरे, संगीता व्यापारी, रजनी आघात, रूपाली मामीडवार यांनी पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले.
➡️

प्रशिक्षणात सपना पिंपळकर, राज्य सुलभक यांनी मागील वर्षीच्या मेळाव्यात आणि यावर्षीच्या मेळाव्या त काय विशेष बदल झाले आहे? या बाबी प्रकर्षाने प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडल्या. तसेच अमोल बल्लावार, धनराज येलमुलवार, विवेक इत्तडवार यांनी सहकार्य केले. सदर प्रशिक्षणाला एकूण 56 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत