Top News

मानसिक आरोग्य एक गंभीर समस्या #chandrapur


जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो .हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना तणावमुक्त जीवन देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हाच त्यामागचा उद्देश आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव मुक्त जीवन जगणे अवघड काम झाले आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने तणावाचे जीवन व्यतीत करत आहे.शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.मानसिक आजार टाळण्यासाठी आपण तणाव मुक्त असणे आवश्यक आहे.मानसिक तणाव वाढल्याने आपली समस्या सुटणार नाही पण त्याचा आरोग्यावर मात्र वाईट परिणाम होईल हे निश्चित.जास्त तणावामुळे चिडचिडपणा,विस्मरण,झोप न लागणे,एकटे राहणे,यासारख्या समस्या उद्भवू शकतात.आजकालची जीवनपद्धती ही अतिशय वेगवान आणि फास्टफूड कल्चर आहे.इथे कुणालाही शांत वेळ मिळत नाही.सर्वांनाच ताबडतोब परिणाम अपेक्षित असतात त्यामुळे साहजिकच या शर्यतीमध्ये दमछाक होते व काम पूर्ण न झाल्यास त्याचा मनावर आणि शरीरावर ताण येतो.
जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते पण शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजाराकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ही वेगळी असते.
मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यइतकेच महत्त्वाचे आहे आणि मानवी शरीराची मोठी संपत्ती सुद्धा आहे .आणि म्हणूनच ती जतन करणे कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे.शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य ही दुसरी संपत्ती आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे काळाची गरज आहे.

👍
मानसिक आरोग्य महत्त्वाचे का आहे? याचा जर विचार केला तर मानसिक आरोग्याचे महत्त्व हे आपल्या जीवनात एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. आपले विचार वर्तन आणि भावनांवर त्याचा परिणाम होतो भावनिक दृष्ट्या निरोगी असल्यामुळे आपण आपल्या कामावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो.

👍
जागतिक मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबर १९९२ ला पहिल्यांदा साजरा करण्यात आला.१९९२ मध्ये वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ चे डेप्युटी सेक्रेटरी जनरल रिचर्ड हंट यांनी हा उपक्रम प्रस्तावित केला होता.
👍

सध्याच्या काळात मानसिक आरोग्य सांभाळण्याचे मोठे आव्हान मानव जातीसमोर उभे झालेलेआहे.स्पर्धा, ताणतणाव, इंटरनेट, मोबाईल गेम्ससाठी वापर अशा कारणांमुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे ही एक मोठी गंभीर समस्या निर्माण होत आहे.

👍
भारतात मानसिक आरोग्य हा विषय कायम दुर्लक्षित राहिलेला विषय आहे .जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात एक अब्ज लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.तरुण पिढीबद्दल बोलायचं झालं तर जगातील २०% तरुण मुले मुली मानसिक विकाराने ग्रस्त आहेत.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्या संबंधित जागरूकता नसल्यामुळे दहा पैकी पाच रुग्णांना त्यांचे मन आजारी आहे हे देखील कळत नाही. भारतातील छप्पन कोटी लोक नैराशानी ग्रस्त आहेत.७.५ टक्के लोकांना मानसिक आजार आहे हा आजार २०% पर्यंत जाऊ शकतो.
मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.आपले शरीर आणि मन वेगळे नाहीत.म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले राखणे हे गरजेचे आहे.मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम कौटुंबिक आणि मित्र परिवारावर होऊ शकतो.सध्याच्या परिस्थितीमध्ये ताणतणावाचं व्यवस्थापन करून सकारात्मक दृष्टिकोन जपल्यास अनेक‌ मानसिक आजारापासून‌ आपण दूर राहू शकतो.सकारात्मकता ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे.शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.विश्वासातील लोकांशी सतत संवाद साधत रहा.जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा.मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.स्वतःच्या आवडीचे छंद जोपासा.आपले मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी एवढं आपण नक्कीच करू शकतो,हो ना.....
 म्हणूनच म्हणतात "मन चंगा तो कठौती मे गंगा" कारण मन स्वस्थ असल्यास प्रत्येक व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही योग्य प्रकारे मात देऊ शकतो...
वृंदा पगडपल्लीवार, सावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने