पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर:- पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातर्फे बुधवार दिनांक 19 जून सकाळी 5 वाजता पासून जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पोलिस भरतीचे आयोजन केले आहे. सदर भरतीमध्ये 137 पोलीस शिपाई व 09 बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी पोलिस दलाची तयारी पूर्ण झाली असून, पोलीस शिपाई भरतीसाठी एकूण 22 हजार 583 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरुष उमेदवार 13 हजार 443 व महिला उमेदवार 6 हजार 315 तसेच 2 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. बॅण्डस्मन पदाकरीता पुरुष उमेदवार 2 हजार 176 व महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे.
पोलीस भरतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानााचा वापर


पोलीस भरतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानााचा वापर करण्यात येत आहे. उमेदवाराच्या पायाला मायक्रो चीप लावण्यात येऊन त्याद्वारे अचूक वेळेची गणना केली जाणार असल्याची माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सोमवारी (ता. 17) पत्रकार परिषदेत दिली. (Microchip in candidate leg in police recruitment )


जिल्‍हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची पत्रकार परिषदेत माहिती 

जिल्हा पोलिस दलातर्फे यंदाच्या पोलिस भरतीची जय्यत तयारी करण्यात आलेली असून, या अनुषंगाने जिल्‍हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची मंथम हॉल पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे बुधवार (ता. 19) पासून सुरू होत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी 19 जूनला 600, 20 जूनला 800, 21 जूनला 1200 व सोमवारपासून 1500 उमेदवारांच्या शारीरिक आणि मैदानी चाचण्या घेतल्या जाणार आहेत.


उंची, छातीत जो उत्तीर्ण तोच जाणार पुढे

भरती प्रक्रियेत अचूकता यावी, मानवनिर्मित कुठलीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलिस दलाचा पुरेपूर प्रयत्न असून, उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. उंची मापकांची शास्त्रोक्त तपासणी पोलिस दलाने पूर्वीच करून घेतली. अर्ज भरण्यापासूनची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने याबाबतचे वेळापत्रक, हॉल तिकीट आणि इतर सर्व माहितीचे संदेश संबंधित उमेदवाराच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठविले जात आहेत.


पहाटे पाचला पहिली 'एंट्री'


भरतीच्या पहिल्या दिवशी १९ जूनला पहाटे पाच वाजता उमेदवारांना जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे टाकलेल्या शामियान्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉल तिकीट तपासल्यावर उंची व छाती मोजली जाईल. त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी होईल. नंतर धावण्याच्या स्पर्धा व गोळाफेक घेतल्या जातील. तसेच बाहेर गावाहून आलेल्या उमेदवारांना रात्रीला झोपण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिल शेड मध्ये करण्यात आलेली आहे.


उमेदवाराची गुणांची यादी दररोज लावली जाणार


भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची गुणांची यादी दररोज लावली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. प्राप्त गुणांसह इतर तक्रारी व समस्यांसाठी पोलीस मैदानावर अपील ऐकण्यासाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हजर राहतील.


महिलांची शेवटी चाचणी


भरती प्रक्रियेसाठी एकूण 22 हजार 583 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. पुरुष उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचण्या झाल्यावर महिला उमेदवारांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यात पोलीस शिपाई पदासाठी 6 हजार 315 महिला उमेदवार असून, 2 तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केला आहे. बॅण्डस्मन पदाकरीता महिला उमेदवार 646 तसेच 1 तृतीयपंथी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे.पावसासाठी खबरदारी


जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणी मध्ये पुरुषांची 100 मीटर/1600 मीटर व महिलाची 100 मीटर/ 800 मीटर धावण्याची चाचणी हि कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) वर घेण्यात येईल. त्यामध्ये उमेदवारांना Spike Shoes वापरता येणार नाही. कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) वर Sport Shoes वापरण्याची परवानगी दिली आहे.मानवी हस्तक्षेप नाही, प्रलोभलांना बळी पडू नये


पोलिस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जात असून, कोणीही चुकीच्या माहिती देणाऱ्या अथवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. भरती प्रक्रियेमध्ये ही व्हिडिओ शूटिंग तसेच सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये घेण्यात येणार असल्याने कोणताही उमेदवार कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये, पोलीस भरती शिपाई म्हणून भरती करून देतो असे कोणी बोलत असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार करावी.


मायक्रो चीप म्हणजे काय?


धावण्याची चाचणी घेताना चेस्ट नंबरनुसार निवडलेल्या उमेदवारांच्या पायात मायक्रो चीप लावली जाणार आहे. संबंधित उमेदवाराने सुरवात आणि अंतिम लेन ओलांडताच त्याची अचूक वेळ संगणकात नोंद होईल. मानवनिर्मित त्रुट्या आणि चुका टाळता याव्यात, यासाठी चंद्रपूर पोलीस भरतीत मायक्रो चीपचा वापर केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)