गोंडपिपरी तालुका विभाजनात चक विभाजन Gondpipari pombhurna chandrapur

Bhairav Diwase
0
गोंडपिपरीत चोवीस तर पोंभूर्ण्यात वीस...

गोंडपिपरी आणि लगतच्या पोंभूर्णा तालुक्यातील चक शब्दावरून अनेक गावांची नावे बघायला मिळतात. गोंडपिपरी तालुक्यातून १९९८ मध्ये पोंभुर्णा तहसीलची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २००० पासून चंद्रपूर आणि गोंडपिपरी या दोन स्वतंत्र तहसिल निर्माण झाल्या. तहसीलच्या विभाजनातून गोंडपिपरी तालुक्यात अठ्यानव गावे तर पोंभुर्णा तालुक्यात एकाहत्तर गावे विभाजित झाली. या दोन्ही तालुक्यांत चक हा शब्द असणाऱ्या गावांचे सुद्धा विभाजन झाले.

गोंडपिपरी तालुक्यांत चोवीस तर पोंभूर्णा तालुक्यात तब्बल वीस गावांची नावे चक या शब्दावरून आलेली आहेत. म्हणूनच दोन्ही तालुक्यामध्ये सगळीकडे चक चक ऐकायला येते. चक हा शब्द अनेक गावांच्या पुढे किंवा मागे लागलेला दिसून येतो. चक या शब्दांचा नेमका अर्थ काय? आणि हा शब्द का लागला? गावांची नावे कशी पडली असावी हा एक कुतूहलाचा विषय अनेकांना भेडसावत आलेला आहे.

ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे गाव हा शब्द गाय किंवा गो यापासून बनलेला असल्याचे आढळून येते. पूर्वीच्या काळी शेतीचा शोध लागल्यानंतर भटका माणूस स्थिर झाला. कालांतराने लोक एका ठिकाणी घर करून स्थिर राहू लागले. आणि आजुबाजुची जागा शेतीसाठी वापरू लागले. त्या काळात गुरढोरे हीच माणसांची संपत्ती समजली जायची. मानवी वस्तीमध्ये गाईंना सर्वात मोठा मान होता. वस्तीतील गाई वस्तीच्या सभोवती ज्या जागेमध्ये फिरत त्या त्या परिसराला गाईंची जागा म्हणण्याची प्रथा सुरू झाली. आणि त्यालाच गाव हे नाव पडले.

गोंडपिपरी तालुक्यातील गावे

चक पारगाव, चक पिपरी, चक बापूर, चक लिखीतवाडा, चक वडकुली, चक विठ्ठलवाडा, चक विहीरगाव, चक व्यंकटपूर, चक पातलवाडा, चक घडोली, चक पेल्लूर,चक बेरडी, चक बोरगाव, चक वेडगाव, चक सुकवासी, चक सोमनपल्ली, चक डोंगरगाव, चक तळोधी, चक दरुर, चक तारडा, चक दुबारपेठ, चक नवेगाव, चक नांदगाव,चक गोजोली


पोंभूर्णा तालुक्यातील गावे

चक ठाना, चक खापरी, चक आष्टा, चक बल्लारपूर, चक बामणी, चक नवेगाव, चक घनोटी, चक हत्तीबोडी, चक घोसरी, चक फुटाणा, चक कोसंबी, चक ठाणेवासना, चक आंबेधानोरा, चक बोरगाव रिट, चक डोंगरहळदी, चक चिंतलधाबा, चक पोंभूर्णा, गंगापूर चक , चक सेलूर, चक वेळवा

चक म्हणजे शेत किंवा जमीनीचा मोठा तुकडा

चक हा पंजाबी शब्द तो चक्र वरून आला आहे चकर म्हणजे विशेषतः पाण्याच्या विहिरीशी संबंधित चाक. प्राचीन काळात विशेतः इंग्रज काळात प्रत्येक गावाला एक पाण्याची विहीर वाटप करण्यात आली होती. चकमंडळे ब्रिटिशांच्या काळातील महसूल संकलन प्रणालीवर आधारित आहेत. लागवटीखालील जमिनीला चक क्रमांक देण्यात आले होते. नवीन गावांना त्यांच्या संबंधित पाटबंधारे मंडळ चक क्रमांकाच्या नावाने संबोधितले जात होते.चकबंदी म्हणजे जमिनीची मोजमाप एकत्रित जमीन. नंतर गावाला चक हे योग्य नाव देण्याचे काम तेथील रहिवाशावर सोपविले. गावातील प्रमुखांनी त्यांच्या सोयीनुसार चक या शब्दाला इतर नाव जोडून गावाला नवे नाव मिळाले. कालांतराने चक हा शब्द गाव या शब्दांशी समानार्थी झाले.

अरूण झगडकर
इतिहास अभ्यासक

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)