Dr. Manmohan Singh: देशात ७ दिवसांचा "राष्ट्रीय दुखवटा" जाहीर

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. २००४ ते २०१४ या कालावधीत ते देशाचे पंतप्रधान होते. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?

भारतातील 'राष्ट्रीय दुखवटा' हा संपूर्ण देशाचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक असा मार्ग आहे. 'राष्ट्रीय दुखवटा' एखाद्या 'व्यक्तीच्या' निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्यावेळी,भारतासह परदेशातील भारतीय संस्थांमध्ये (दूतावास, सरकारी संस्था) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही. मेळावे आणि अधिकृत सरकारी मनोरंजनपर कार्यक्रमावरही बंदी असते. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.

कधी आणि कोणासाठी जाहीर करतात?

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.