Four people drowned: चार जणांचा बुडून मृत्यू, ऐन दिवाळीत दुर्देवी घटना

Bhairav Diwase

कोल्हापूर:-
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा बुडून मृत्यू झाला. ऐन दिवाळीत या दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. करवीर तालुक्यातील म्हालसवडेत विहिरीत बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर कळंबा तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत वारणानगर येथे ड्रेनेजमध्ये पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.


म्हालसवडे (ता. करवीर) येथील रंगराव रामचंद्र कांबळे (वय ५३) व मनीषा रंगराव कांबळे (४५) या पती-पत्नीचा त्यांच्याच 'टाका' नावाच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंगराव व मनीषा हे पती-पत्नी दुपारी घरातून शेतात गेले होते.


दरम्यान, सायंकाळच्या सुमारास शेतातील झोपडीत असलेल्या जनावरांसाठी पाणी आणण्याकरिता मनीषा विहिरीवर गेल्या होत्या. पण, पाय घसरून त्या विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले पती रंगरावही विहिरीत बुडाले. या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना काही वेळानंतर लक्षात आली. विहिरीवर तरंगणारे पाण्याचे भांडे व चप्पल यामुळे मनीषा या विहिरीत पडल्या असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून व नात असा परिवार आहे.


कळंबा तलावात पोहताना मुलगा बुडाला

कळंबा येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. संग्राम कुमार काळे (वय १३, सध्या रा. कळंबा. मूळ गाव कलागदी, जिल्हा विजापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास संग्राम तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. तो घरी परतलाच नाही. त्याचे कुटुंबीय तलाव परिसरामध्ये शोध घेत होते. दरम्यान, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तलावातील पाण्यावर संग्रामचा मृतदेह तरंगताना आढळून आला.


यावेळी त्याच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. संग्रामने सांडव्यावरून तलावात सूर मारला. परंतु, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व अचानक दम लागल्याने संग्रामचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुमार किशोर काळे (४०) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत कळंबा येथील नरके कॉलनी परिसरात राहतात. ते मूळचे कर्नाटक येथील कलागदी गावचे आहेत. गवंडी काम करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात.


ड्रेनेजमध्ये पडून कोडोलीच्‍या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

कोडोली येथील एका स्विमिंग टॅकच्या बाजूला असलेल्या ड्रेनेजमध्ये तोल जाऊन पडल्याने पाच वर्षांच्या बालकाचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. शर्विल सुदर्शन पाटील (वय ५, रा. गणेश पार्क, कोडोली ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शर्विल हा वडील सुदर्शन पाटील यांच्यासोबत स्विमिंग टँकवर गेला होता. सुदर्शन हे शर्विलला बाजूला कठड्यावर बसवून स्विमिंग टँकमध्ये पोहत होते. त्यावेळी शर्विल हा बाजूच्या कठड्यावर खेळत असताना तोल जाऊन तो ड्रेनेजमध्ये पडल्याचे कोणाला समजले नाही.


वडील सुदर्शन यांना शर्विल कोठे दिसत नाही हे लक्षात आल्यावर ते शोध घ्यायला लागले. शर्विल दिसेनासा झाल्याने शोध सुरू केला असता तेथील काहींनी अंदाजे दहा फूट खोल असलेल्या ड्रेनेजमध्ये पडला का म्हणून बघितले असता ड्रेनेजचे झाकण उघडे दिसले. तेथे पहिले असता तो त्या पाण्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.