Chandrapur News: चंद्रपुरात 'राष्ट्रीय एकात्मता दौड' उत्साहात

Bhairav Diwase
गांधी चौक ते जटपुरा गेट दुमदुमला परिसर!
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात राष्ट्रभक्तीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रीय एकात्मता स्वातंत्र्य चेतना महोत्सवांतर्गत शहरात 'राष्ट्रीय एकात्मता दौड' (Run for Unity) अत्यंत उत्साहात पार पडली.


स्थानिक गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर ही दौड काढण्यात आली. निमित्त होते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे. तसेच, स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या ‘वंदे मातरम’ गीतालाही १५० वर्षे पूर्ण होत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौडीचा शुभारंभ केला. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी यावेळी ट्रॅफिक नियमांचे पालन आणि '११२' उपक्रमाचा संदेश देत पोलीस दलाचा सहभाग नोंदवला.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक जीवतोडे यांनी नमूद केले की, सर्व शैक्षणिक संस्था एकत्र आल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा भाव अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन 'भारत हा सर्व जाती-धर्मांचा एक देश आहे' हा संदेश दिला. या दौडीने चंद्रपूरकरांच्या मनात पुन्हा एकदा देशप्रेमाची आणि एकतेची भावना जागृत केली आहे.