Chandrapur police Bharati: चंद्रपूर पोलीस भरतीचा 'काऊंटडाऊन' सुरू

Bhairav Diwase
१५ मार्चला लेखी परीक्षा; २३२१ उमेदवारांची 'अग्निपरीक्षा'!
चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस दलातील २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या २३२१ उमेदवारांची परीक्षा येत्या १५ मार्च रोजी शहरांतील दोन मोठ्या केंद्रांवर पार पडणार आहे.
पारदर्शकतेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त आणि हायटेक देखरेख तैनात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या मैदानी चाचणीत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून गुणवत्ता आणि आरक्षणानुसार १:१० या प्रमाणात निवड करण्यात आली आहे. यामध्ये १५६८ पुरुष आणि ७५३ महिला उमेदवारांचा समावेश आहे.


परीक्षा केंद्रे आणि वेळ:
पुरुष उमेदवार: राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज अँड रिसर्च टेक्नॉलॉजी, चंद्रपूर.

महिला उमेदवार: सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर.
वेळ: सकाळी ११:०० वाजता (उमेदवारांनी सकाळी ८:३० पर्यंत हजर राहणे अनिवार्य आहे).


हायटेक सुरक्षा आणि नियमावली

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांची हजेरी बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

आवश्यक कागदपत्रे: मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

काय आणू नये: मोबाईल, स्मार्ट वॉच, डिजिटल डायरी, मायक्रोफोन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सक्त बंदी आहे.

सुविधा: उमेदवारांना केंद्रावर पेन, रायटिंग पॅड, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन:

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये. केवळ तुमच्या कष्टावर आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवा," असे आवाहन त्यांनी केले आहे.