चंद्रपूर:- चंद्रपूर-नागपूर राज्य महामार्गावर सिंदेवाहीनजीक असलेल्या पळसगाव जाट येथील नदीपात्रात रेती भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असून अपघात इतका भीषण होता की, पुलाची तब्बल १०० फूट लांबीची सुरक्षा भिंत पूर्णपणे तुटून पडली आहे.
रेतीने भरलेला हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट नदीपात्रात कोसळला. सुदैवाने, या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या अपघाताने सिंदेवाही तालुक्यातील अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाळू, गिट्टी आणि मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार आणि वाहनांचा सुसाट वेग यामुळे या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर आणि ट्रकद्वारे अवैध वाळूची वाहतूक राजरोसपणे केली जाते. "रात्रीच्या वेळी प्रशासन गाढ निद्रेत असते आणि वाळू माफिया आपले काम फत्ते करतात," अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. यापूर्वीही अनेक निष्पाप नागरिकांना अशा अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे.


