Accident News: लग्न आटपून घरी निघाले होते, रस्त्यातच काळाचा घाला!

Bhairav Diwase

स्कॉर्पिओ-ट्रॅव्हल्सच्या धडक; अनेकांचा मृत्यू
गडचिरोली:- गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ वाहनाचा ट्रॅव्हल्सशी धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला पाच जण गंभीर जखमी आहेत. गडचिरोली लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात सायंकाळी 6.45 वाजता घडला. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी 3 वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची टार्निंगवर जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.